Tuesday, May 27, 2014

पत्रभेट

सारखा वाजणारा गजर बंद करून एकदाचा तो उठला आणि सवयीप्रमाणे मोबाइल मधले मेसेजेस चेक करत बसला. इतक्यात दारावरची घंटी वाजली …  'शनिवारी सकाळी १० वाजता कोण आलं असावं' असा विचार करत, आळोखे-पिळोखे देतच दार उघडून बघतो तर दारात कोणीच नाही, आणि कडीला एक पत्र लावलेलं!!
'मोबाइल, whatsapp च्या जमान्यात पत्रं कोण लिहितंय यार आणि ते पण मला… मित्रांपैकीच कुणी मस्करी केली नाही ना' असा विचार करत त्यानं पत्ता वगैरे तपासला.  आपलच नाव आहे आणि पत्ता पण बरोबर आहे. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे प्रेषक मध्ये एका मुलीचं नाव … नक्की काय गोची आहे बरं???
काही अंदाज येईना म्हणून उगाचच त्याने पत्राचा वास वगैरे घेऊन बघितला … वरून खालून पत्र काही वेगळं दिसतंय का बघितलं … पण काहीच नाही आणि हे गुप्त्हेरी चाळे आपण दार उघडं ठेवूनच करतोय हे लक्षात आल्यावर एकदमच तो ओशाळला… कोणी बघितलं तर नाही याची खात्री करून त्यानं दार लावून घेतलं.

आत आल्यावर उगाचच ते पत्र टेबलावर ठेवून पुन्हा एकदा प्रेषकाचं नाव वाचून काढलं … आपलं पण नाव आणि पत्ता वाचून काढला …. अक्षर तर चांगलं आहे… स्वत:च  नाव असं एखाद्या कागदावर वाचून किती दिवस, किती वर्ष होऊन गेले याचा उगाच अंदाज लावीत तो बसला. खरं तर ते पत्र वाचायची आणि त्यातला मजकूर जाणून घेण्याची इच्छा त्याला होतीच… पण या उत्सुकतेच्या क्षणांचा एक वेगळाच आनंद त्याला मिळत होता आणि तो त्याला हरवायचा नव्हता. हस्तलिखित पत्राच्या निमित्ताने का होईना आपण जुन्या जमान्यात जाऊन पोचलो आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला याचं त्याला वेगळंच अप्रूप वाटलं.

थोड्या वेळाने पत्र उघडून वाचल्यावर त्याच्या लक्षात आलं कि आपल्यासाठी वधूसंशोधन सुरु असल्यामुळे, घरच्यांनी आपलं नाव आणि पत्ता एका मासिकात दिला होता आणि हे पत्र इच्छुक वधुनेच लिहिलं आहे  … आपली जुजबी माहिती विचारण्यासाठी आणि भेटायचं का, कुठे वगैरे ठरवण्यासाठी…  पण आपला मोबाइल नंबर दिलेला असताना कोणी सरळ फोन का करत नाही, अर्थात पत्रातली भाषा फोनवर बोलणे शक्य नाही हेही खरच म्हणा… पण या सगळ्या गोष्टींवर विचार करत बसण्यापेक्षा घरी फोन करून एकदा खात्री करून घेऊ म्हणून त्याने घरी फोन केला … घरच्यांशी बोलून मासिकाचं नाव पडताळलं आणि मुलीविषयी थोडीफार माहिती विचारून घेतली. सगळं ठीक आहे म्हटल्यावर मुलीचा फोन नंबर पण घेतला ….


फोन करण्यापूर्वी त्याला वाटलं 'आपण "इट का जवाब इटसे" देऊया ना'… पत्राला उत्तर पत्रानेच देऊ… असेल एखादी मुलगी वेगळ्या विचारांची …पत्रलेखनावर विश्वास असणारी… आपणहि काही कमी नाही… बघू तर जमतंय का … नाहीतर फोन आहेच!


पहिल्यांदाच एका अनोळखी व्यक्तीला "पत्र" लिहित होत तो … हातात पत्र आणि पेन घेऊन बसल्यावर शब्दच सुचेनात … ठरवलं होतं काय एवढं त्यात ,४ ओळी खर्डायच्या आणि द्यायचं पाठवून … पण खरडणं एवढं सोपं वाटेना … बापरे हि मुलगी लेखिका वगैरे आहे कि काय हिनं कसं काय एवढं पत्र लिहिलं असेल … का हिला बोलण्याचा काही प्रोब्लेम आहे म्हणून …? जाऊदे पत्रात हेच तर सगळं लिहू …

बऱ्याचदा खाडाखोड करून पत्र लिहून झाल्यावर वाटलं कि हे आहे आपल्या मनासारखं …. म्हणून परत एकदा वाचलं तर वाटलं की अरे अजून काही सुधारणा हव्यात … म्हटलं जाऊदे laptop  काढू, मराठीत टाइप करू आणि मग परत एकदा स्वच्छ कागदावर उतरवू … बापरे एवढे कष्ट(!!!) … तेही एका मुलीसाठी , जिला आपण कधी भेटलो नाही, ओळखत पण नाही … काय गरज आहे?…  का त्या मुलीने पण घेतले असतील एवढे कष्ट … आपल्यासाठीच ना … ती तरी कुठं ओळखते आपल्याला … जाऊदे आता ठरवलंय ना, "इट का जवाब इटसे"… पत्र लिहितोयच तर वाचणाऱ्याला (किंवा स्वतःलातरी किमान) वाचावसं वाटेल असंच लिहू …
परत एकदा मनाचा हिय्या करून त्याने laptop उघडला, बराच वेळ दिल्यावर मनासारखं पत्र लिहिलं गेलं आणि मग ते कागदावर उतरवून त्याने मोकळा श्वास घेतला.


पत्र पाठवल्यावर पुढचे काही दिवस उत्सुकतेत, अनामिक ओढीत गेले …. एके दिवशी ऑफिसमधून येताना दाराला पत्र लावलेलं दिसलं आणि त्याची कळी एकदम खुलली … दार उघडून बाकीचे नेहमीचे सोपस्कार करत बसण्यापेक्षा गडबडीने त्याने पत्र उघडून वाचायला सुरुवात केली …. उत्सुकतेन आता आश्चर्यावर मात केली होती.

"

……  पत्राने संवाद साधण्यामागे माझे काही हेतू होते….
एक तर आजकाल पत्रं लिहिली जात नाहीत, मोबाईलच्या युगात तर त्याचा कंटाळाच येतो… त्यामुळं एखाद्या अनोळख्या व्यक्तीसाठी तुम्ही हे कष्ट, हि एक्स्ट्रा स्टेप घ्याल का ते मला पहायचं होतं.
दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी असणारी एक अनामिक उत्सुकता मला अनुभवायची होती …. फोनवर बोलून भेटलो, तर तो अनुभव मिळेलच असं सांगता येत नाही …कदाचित मिळेलहि … पण आपण फोनवर बोललो नाही, त्यामुळे पत्राची वाट बघण्यात एक वेगळीच मजा आली … तुम्ही पण पत्रानेच उत्तर दिलत त्यामुळे ती मला अनुभवता आली.
सगळ्याच गोष्टी जशा फोनवर बोलता येत नाहीत तशा पत्रातूनपण लिहिता येत नाहीत हे खरं, पण पत्रलेखनामुळे वेगळ्याच तारा छेडल्या जातात हेही खरंच!
आणि महत्वाचं म्हणजे 'पत्र कोण लिहित बसतय वेड्यासारखं' असा विचार करून तुम्ही माझ्या विचारांना झिडकारलं नाहीत, उलट आजच्या काळात थोडासा वेगळा वाटणारा हा प्रयोग करण्यात मला साथ दिलीत याबद्दल आभार!
तुमच्यासारख्या व्यक्तीला भेटायला मला नक्कीच आवडेल ….


"

पत्र वाचता वाचता नकळत हास्याची एक लकेर त्याच्या चेहऱ्यावर उमटली ….

1 comment: