सकाळची साडेअकराची वेळ, स्वारगेटचं बस स्थानक! चिंचवडकडून कोल्हापूरला निघालेली आमची गाडी स्थानकात शिरली आणि तिथली अशक्य गर्दी पाहून सगळेच चपापले, अर्थात वाहक व चालक सोडून. खरं तर वाढती लोकसंख्या, शहराकडे धावणारी तरुणाई आणि दूरदृष्टीचा अभाव असणारं राज्यतंत्र पाहता शनिवारी अशी गर्दी असणे साहजिक आहे, पण दोनच दिवसांनी होणारं गणरायाचं आगमन हे हि त्याला कारणीभूत होतं.गाडी थांबली तशी दारात ही गर्दी जमली आणि वाहकानं निर्विकारपणे "फक्त reservation असणारयांनीच चढा" अशी घोषणा केली. तरीपण "standing allow आहे काय?" असा अर्धवट इंग्रजीतून प्रश्न एका अर्धवट माणसाने विचारलाच. यथावकाश गाडी भरल्यावर पुढं चार, मागे चार आणि मध्ये दोघे तिघे जण उभ्यानेच प्रवास करण्यासाठी चढले.
माझ्या जागेच्या थोडं पुढे एका आजोबा उभे राहिले. धोतर आणि गांधीटोपी बघून ते एखाद्या खेड्यातून आले असावेत असं जाणवलं. मी तिशी जवळ पोचलेला, तर ते साठी पार केलेले वाटले. मागे वळून त्यांनी कुठे जागा शिल्लक आहे का बघितलं पण कुठं जागा नसल्यामुळे ते उभेच रहिले. त्यांना आपली जागा द्यावी का असा विचार माझ्या मनात आला पण ते कुठवर जाणार आणि उभं राहून जाण मला जमेल कि नाही या शंकेमुळ मी बसूनच रहिलो. आजुबाजुला बघितलं तर संगणकीय आरक्षण केलेले माझ्यासारखे बरेच तरुण बसून होते, स्वतःच्या आणि बाकीच्यांच्याही कोडगेपणाला नावं ठेवत मी खिडकीतून बाहेर बघत रहिलो. शहरातून प्रवास करताना अर्ध्या तासाचं अंतर असेल तर मी वृध्दांना जागा देत असे, पण इथं अंतर खूप होतं. आणि माझं मन मला स्वस्थ बसू पण देत नव्हतं. अशा बाक्या प्रसंगातून सुटका म्हणून मी झोपेचा रामबाण उपाय स्वीकारला. थोड्या वेळानं गाडी भोजन विश्रांतीसाठी थांबली. जेवण झाल्यावर पण मी माझ्या जागी डोळे मिटून बसून रहिलो.
पण निद्रादेवी मला काही पावेना, त्यामुळे मी मनाचा हिय्या
करून उठलो आणि त्या आजोबांना विचारलं "तुम्हाला कुठे जायचं आहे?". तेही
कोल्हापुरलाच जाणार होते, म्हणजे अजून किमान ३ तास उभारावं लागणार होतं.
तरी पण मी त्यांना माझ्या जागी बसायला सांगितलं आणि बाजूला उभा राहिलो. ते
"नको, नको" म्हणू लागल्यावर मी त्यांना म्हटलं "तुम्ही बसा, माझे पाय दुखू
लागले कि मी सांगेन". त्यावर मग ते तयार झाले आणि माझे आभार मानून जागेवर
बसले. त्यांना आराम मिळाल्याचं बघून आणि आपल्या हातून एक चांगलं काम
घडल्याच्या आनंदात मी उभा राहिलो. बाजुच्या १-२ प्रवाशांनीहि माझं कौतुक
केल्यामुळे तर माझे सगळे श्रम नाहीसे झाले. त्याच आजोबांशी गप्पा मारता
मारता वेळ कसा जात होता कळलच नाही.
"उठा आता, आलं कोल्हापूर", माझा सहप्रवासी मला उठवत होता,
मी चमकून इकडे तिकडे बघितलं, तर ते आजोबा ज्या जागी उभे होते तिथेच बसले
होते, कोल्हापूर आलं म्हटल्यावर तेही उठून उभे राहिले. आधीच आळसावलेल माझं
शरीर मला आणखीनच जड वाटू लागलं. जेवण करून आल्यावर कधी झोपलो आणि कधी
स्वप्नात शिरलो ते मला कळालच नाही. चांगलं काम करायची संधी दवडल्याची
हुरहुर माझ्या मनाला लागून राहीली. आपल्याच क्रीयाशून्यतेचि जखम
सोसत मी गाडीतून खाली उतरलो, पाय जमिनीवर टेकवले आणि घराकडे निघालो.