Thursday, November 8, 2018

आणि ... डॉ. काशिनाथ घाणेकर




बऱ्याच दिवसांनी एखादा मराठी चित्रपट थेटरात जाऊन बघितला. whatsapp च्या पोस्ट्स ला बळी पडून नव्हे. तर चित्रपटाच्या ट्रेलर ला भुलून.

एखाद्या कलावंताचं आयुष्य पडद्यावर आणणारा हा काही पहिला चित्रपट नाही आणि शेवटचा पण नसेल. पण हा चित्रपट लक्षात राहणारा मात्र नक्कीच आहे.
एका दंतवैद्याची नाट्यक्षेत्रात काम करण्यासाठीची धडपड दाखवत चित्रपट सुरु होतो. त्यानंतर मग कष्टानं मिळवलेलं यश, पण त्या यशाची चढलेली नशा, नाट्यक्षेत्रातले प्रतिस्पर्धी, मित्र, व्यक्तिगत जीवनातले चढउतार, अपयशाची परत एकदा भेट, लोकप्रियतेची लागलेली चटक, व्यसनाधीनता अशा कितीतरी वळणावळणाच्या वाटेवरून हा प्रवास पुढे पुढे सरकत राहतो. आणि महत्वाचं म्हणजे प्रेक्षक देखील तितकाच गुंतून जातो, प्रेक्षक त्या प्रवासाचा एक भाग नक्कीच बनून जातो.
त्यामुळंच जेव्हा काशिनाथच्या अभिनयासाठी चित्रपटात टाळ्या किंवा शिट्ट्या पडतात, तेव्हा त्या आपल्याला पण वाजवाव्याशा वाटतात, आणि काशिनाथ जेव्हा चुकीचं वागतो तेव्हा त्याचा तितकाच राग  देखील येतो, आणि हेच या चित्रपटाचं यश आहे. अर्थात त्या यशात सिंहाचा वाटा हा सुबोध भावेचा आहे, डॉक्टरांची भूमिका त्यानं खरंच जिवंत केली आहे. बाकीच्या अभिनेत्यांनी दिलेली साथ तितकीच मोलाची आहे, पण चित्रपटभर व्यापून राहणं आणि नंतरही उरणं म्हणजे काय ते सुबोधचा अभिनय बघून लक्षात येतं.

एका अर्थानं बघायला गेलं तर डॉ काशिनाथ घाणेकर हे मराठी नाट्यभूमीतले 'संजू' होते असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं आयुष्य (आणि मृत्यूही) हे तितकंच नाट्यमय होतं, त्यात कष्ट, यश-अपयश, चढउतार, व्यसनं, प्रेम प्रकरणं असा सगळा मसाला खरं  तर ठासून भरला आहे. पण लेखक-दिग्दर्शकानं हा फक्त मसाला चित्रपट म्हणून मांडलेला नाही, तर एखादा कलावंत जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो तेव्हा त्याला कोणकोणत्या पातळीवर संघर्ष करावा लागतो, आणि तो संघर्ष करणारा शेवटी तोहि एक माणूसच असतो हे दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. कलावंतांच्या वैयक्तिक जीवनातले चढ उतार व्यावसायिक जीवनात कसे प्रभावी किंवा धोकादायी ठरू शकतात यावर देखील चित्रपट प्रकाश टाकतो.
एकंदरीतच अभिनय, लेखन, दिग्दर्शन, संवाद अशा सर्वच गोष्टींसाठी आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासातलं एक सोनेरी म्हणता येणार नाही, पण 'रसरसतं-धगधगतं' पान वाचण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघितला पाहिजे.